भडगाव बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत मंगळसूत्राची चोरी,अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव बसस्थानक परिसरात दिवसाढवळ्या गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्राची पोत लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आमडदे (ता. भडगाव, जि. जळगाव) येथील रहिवासी रोहिणी विजय पाटील (वय ४७, व्यवसाय शेती) या २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २.३० वाजेदरम्यान भडगाव बसस्थानकातून पोचोरा ते पारोळा जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसमध्ये मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४.४ ग्रॅम वजनाची व अंदाजे २० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळसूत्राची पोत लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.
घटनेनंतर फिर्यादीने २६ फेब्रुवारी रोजी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानुसार भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा क्रमांक ४७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास सफौ प्रदीप चौधरी हे करीत असून, पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.
दरम्यान, भडगाव बसस्थानक परिसरात यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या असून, प्रवाशांनी विशेषतः महिला प्रवाशांनी गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने वापरताना अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा