भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल–पोलीस प्रशासनाची धडक मौजे वाक येथे २ डंपर व १ जेसीबी जप्त.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत मोठी धडक दिली आहे. तालुक्यातील मौजे वाक परिसरात दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे २ डंपर व १ जेसीबी ताब्यात घेण्यात आले असून संबंधित वाहने तहसील कार्यालय भडगाव येथे जमा करण्यात आली आहेत.
मा. तहसीलदार सो. भडगाव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई राबविण्यात आली. मौजे वाक परिसरात विनापरवाना वाळू उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर तात्काळ पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान कोणतीही वैध परवानगी अथवा शासकीय कागदपत्रे नसताना वाळू वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणारी वाहने ताब्यात घेण्यात आली.
या संयुक्त कारवाईत मा. तहसीलदार शीतल सोलाट मॅडम, PSI सुशील सोनवणे साहेब, ग्राम महसूल अधिकारी समाधान हुल्लुळे, प्रशांत कुंभारे, विवेक महाजन, गितेश महाजन, योगेश पाटील, एम. जे. खाटिक, प्रमोद पाटील, महसूल सहाय्यक महादू कोळी, महसूल सेवक अमोल पाटील, विशाल पाटील तसेच पोलीस पथक सक्रिय सहभागी होते.
अवैध वाळू उत्खनन व वाहतूक यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शासनाच्या महसुलावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारवायांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून भविष्यातही तालुक्यात सातत्याने तपास मोहिमा राबविण्यात येतील, असा इशारा तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर नियमानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टिप्पणी पोस्ट करा