लग्नातील बँडच्या वादातून रक्तरंजित हल्ला,जिवेठार मारण्याच्या प्रयत्नातील तिघे अवघ्या २४ तासांत जेरबंद
कासोदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गोपनीय माहितीवर तपासाला यश.
कासोदा प्रतिनिधी :–
लग्नातील बँडची गाडी पुढे नेण्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद थेट जिवेठार मारण्याच्या प्रयत्नापर्यंत गेला. सुमारा हनुमंतखेडे बु. (ता. एरंडोल) येथे भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र या घटनेनंतर फरार झालेल्या तिन्ही आरोपींना कासोदा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक करून कायद्याच्या कचाट्यात आणले, त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
भरदिवसा शाळेच्या आवारात हल्ला
दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २.१० वाजता, गावातील मराठी शाळेच्या आवारात लग्नसमारंभासाठी आलेल्या बँडच्या गाडीवरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर अचानक मारहाणीत झाले. आरोपी महेश प्रकाश बेडसे (पाटील) व गौरव विजय बहिरम (पाटील) यांनी फिर्यादी अरुण भिला पाटील यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपी संदीप धोंडु बेडसे (पाटील) याने हातातील चाकूने वार करून फिर्यादीचा जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. घटनेदरम्यान साक्षीदार विनय विकास उर्फ भैय्यासाहेब पाटील यांनाही दुखापत झाली.
आरोपी पसार, पण पोलिसांचा पाठलाग थांबला नाही
घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार झाले होते. कोणताही ठोस तांत्रिक पुरावा उपलब्ध नसतानाही कासोदा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. विशेष पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर पोलिसांच्या कसून तपासाला यश येत २४ तासांच्या आत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
गुन्हा दाखल – न्यायालयात हजर
या प्रकरणी कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 0030/2026 अन्वये भा. न्या. संहिता 2023 चे कलम 109, 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना माननीय न्यायालयापुढे हजर करण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव विभाग श्री. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली.

टिप्पणी पोस्ट करा