Top News

सायन्स दिनानिमित्त समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न.!!!

सायन्स दिनानिमित्त समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :—

सायन्स दिनाचे औचित्य साधून भडगाव येथील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नाविन्यपूर्ण, उपयुक्त व संशोधनात्मक प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

विद्यार्थ्यांनी विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडत विज्ञानाची गोडी निर्माण केली. प्रदर्शनात पर्यावरण संवर्धन, नवीकरणीय ऊर्जा, जलसंधारण, आरोग्यविषयक उपाययोजना, आधुनिक तंत्रज्ञान तसेच दैनंदिन जीवनातील समस्यांवर आधारित विविध प्रकल्प सादर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेले हे प्रकल्प समाजोपयोगी असल्याने उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

प्रत्येक प्रकल्पामागील वैज्ञानिक संकल्पना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने, सुस्पष्ट व प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून समजावून सांगितली. या विज्ञान प्रदर्शनाला पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने भेट दिली.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेचे, विचारक्षमतेचे व सादरीकरण कौशल्याचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती तसेच समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संस्थापक शशिकांत महाजन यांच्या उपस्थितीत, शाळेच्या व्यवस्थापन व मुख्याध्यापक शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राकेश पाटील व किरण गढरी सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने