कासोदा पोलिसांची मोठी कारवाई.निपाणे येथील गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त५० हजारांचा मुद्देमाल नष्ट, दोन आरोपींवर कारवाई
एरंडोल प्रतिनिधी :-
कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील निपाणे गावाच्या शिवारात अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांविरोधात कासोदा पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे १००० लिटर कच्चे रसायन जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले असून दोन आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी भट्या नाल्याकाठी तसेच चौक्या नाल्याकाठी गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार तात्काळ पथक रवाना करून छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान निपाणे शिवारात नारायण वना भिल व तानकु गुलाब भिल (रा. निपाणे, ता. एरंडोल) हे दोघे प्लास्टिकच्या २० ड्रममध्ये (प्रत्येकी ५० लिटर) गुळ, नवसागर व पाण्याचे मिश्रण असलेले कच्चे रसायन लाकडी काठीच्या सहाय्याने ढवळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील एकूण १००० लिटर कच्चे रसायन जप्त केले.
सदर रसायन गावठी दारू निर्मितीसाठी वापरले जात असल्याने ते जागीच नष्ट करण्यात आले. या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर-पवार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजय ठाकुरवाड यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत श्रेणी पो.उ.नि. रामकृष्ण पाटील, पो.हे.कॉ. नितीन सूर्यवंशी, पो.कॉ. योगेश पाटील व पो.कॉ. लहु हटकर सहभागी होते.
गावठी हातभट्टी दारूमुळे परिसरातील आरोग्य व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने अशा अवैध व्यवसायांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा कासोदा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा